चाळीसगाव, प्रतिनिधी :-
तालुक्यातील गणपूर येथील चितेगांव शेत शिवाराततील कोरड्या नाल्यात अंदाजे एका दिवसाचा नवजात अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील गणपूर येथील झटक्या देववस्ती जवळील चितेगांव शेत शिवाराततील कोरड्या नाल्यात अंदाजे एकाच वर्षांचा पुरुष जातीचा नवजात अर्भक आज रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास मिळून आला आहे. बिस्मिल्ला अब्दुल पिंजारी (रा. चाळीसगाव) यांच्या मालकीच्या पडीक शेतात नवजात अर्भक हा आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस पाटील सोमनाथ कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्याचबरोबर सदर बालकाच्या पालकाबाबत त्यांनी परिसरात विचारपूस केली असता मिळून आले नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्ती नवजात बालकाला सोडून गेले असावे. हे स्पष्ट झाल्यानंतर लागलीच त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांशी संपर्क करून रूग्णवाहिका बोलावली. पंचणामे करण्यात आले असून त्या बाळाला औषधोपचारकामी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पाटील सोमनाथ कुमावत यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.