प्रतिनिधी: अवधुत सावंत
अंबरनाथमधील वडापाव विक्रेत्याच्या ९ वर्षीय मुलाचे ४० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करण्यात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिट-३ ला यश आले आहे. अंबरनाथ पूर्वेकडे राहणाऱ्या सोनूकुमार बारेलाल सविता यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सोनू कुमार यांच्या कृष्णा नावाच्या नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. कृष्णा चौथ्या इयत्तेत 'न्यू डेक्कन इंग्लिश स्कूल'मध्ये शिक्षण घेतो. सद्या शाळा बंद असल्यामुळे तो घरीच होता. परंतु जवळच असलेल्या ट्युशनसाठी जात होता. बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ नंतर 'परशुराम रेसिडेन्सी' येथून येत असताना अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले. आई-वडिलांना कृष्णा सुखरूप परत हवा असेल तर चाळीस लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी इंटरनेट कॉल वापरून अपहरणकर्त्याने दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली. कृष्णाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणण्यासाठी क्राईम ब्रँचचा तपासाला वेग वाढला होता. त्यासाठी घटना घडलेल्या परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यावरून संशयित इसमाचे फोटो तयार करण्यात आले. संशयिताच्या वर्णनाप्रमाणे कुणी व्यक्ती या परिसरात आली आहे अगर कसे याविषयी सर्व ठिकाणी स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचने सर्वत्र शोध घेतला. संगणक तज्ज्ञांची देखील मदत घेण्यात आली. तांत्रिक विश्लेषण व प्रत्यक्ष फिल्डवरील माहितीचे साह्य घेऊन कृष्णाचे अपहरण करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी तपास चक्रांना वेग दिला.
क्राईम ब्रँचच्या युनिट-३ चे विनोद चन्ने, किशोर पाटील आणि बाळा पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वपोनि विलास पाटील, सपोनि भूषण दायमा, फौजदार मोहन कळमकर यांच्यासह पथकाने सापळा रचला आणि अपहृत कृष्णाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणले. त्याचबरोबर खंडणीसाठी कृष्णाच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या प्रभात कुमार अमरसिंह वय ३० वर्ष, अमजद मन्सूर खान २३ वर्ष, योगेंद्र जवाहरलाल सिंग २० वर्ष, सुनिल सिताराम लाड ५७ वर्ष या चार अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. अपहरणकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून कृष्णाशी ओळख वाढवली. त्याच्यासोबत क्रिकेट खेळणे, चॉकलेट देणे, गप्पा मारण्याच्या माध्यमातून त्यातील एकाने कृष्णाशी मैत्री केली. मात्र स्वतःचे नाव कृष्णाला कळू दिले नाही. अपहरणकर्त्यांनी कृष्णाचे अपहरण केले मात्र त्याला काहीही कळू न देता त्याच्या आई-वडिलांकडे चाळीस लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाला ठार मारण्यात येईल, अशीही अपहरणकर्त्यांनी धमकी दिली होती. मात्र अपहरणकर्त्या चौघांच्या तावडीतून कृष्णाची सुखरूप सुटका करण्यात क्राईम ब्रँचला यश आले. सर्वच स्तरातून कल्याण क्राईम ब्रँच घटक-३ चे कौतुक होत आहे.