गणेश विसर्जनासाठी तुर्भे विभागात नवी मुंबई महापालिकेच्या वतीने तीन कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत. मात्र या ठिकाणी नैसर्गिक तलाव असतानाही पालिकेने या वर्षी कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय का घेतला आहे. गणेश विसर्जनासाठी तुर्भे विभागात नवी मुंबई महापालिकेच्या वतीने तीन कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत. मात्र या ठिकाणी नैसर्गिक तलाव असतानाही पालिकेने या वर्षी कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय का घेतला आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्येक तलावासाठी साडेतीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील तलावांचे सुशोभीकरण केले आहे. यासाठी विशेष पद्धत वापरून तलावांचे दोन भाग करून एक भाग विसर्जनासाठी तयार केला आहे. यासाठी खास गॅबियन पद्धतीने तलावात भिंती उभारण्यात आल्या आहेत. यामुळे तलावाच्या ज्या भागात मूर्ती विसर्जन केले जाते, त्याच भागात पाण्याचे प्रदूषण होते. परिणामी, तलावाची स्वच्छता करणेही सोयीचे होते. यासाठी पालिकेने शहरातील प्रत्येक तलावावर लाखो रुपये खर्च केले आहेत. यामुळे मागील काही वर्षे पालिकेने मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारणे बंद केले आहे. मात्र आता या वर्षासाठी महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील सानपाडा, तुर्भे आणि कोपरी गाव येथे कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही भागांत नैसर्गिक तलावाची व्यवस्था आहे. त्या तलावांतही गॅबियन पद्धतीने भिंत उभारण्यात आली आहे. दरवर्षी या तलावात व्यवस्थितपणे मूर्तींचे विसर्जन होते. मात्र असे असतानाही याच ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय पालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. यानुसार, सानपाडा परिसरातील सेक्टर ८, ९ आणि १० या भागासाठी कृत्रिम तलाव उभारण्यासाठी ३,७५,१६७ रुपये, तुर्भे गावातील सेक्टर २६ आणि कोपरी गावातील गणेशभक्तांसाठी कृत्रिम तलाव उभारण्यासाठी तीन लाख ५६ हजार ५६६ आणि तुर्भे विभागातील इंदिरानगर, गणपती पाडा आणि बोनसरी गाव येथील गणेशभक्तांसाठी कृत्रिम तलाव उभारण्यासाठी तीन लाख ५६ हजार ९२ रुपये खर्च केला जाणार आहे