गणपती
गणेशभक्त दरवर्षी गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असता. गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशभरात गणेशोत्सव साजरा केला जाणार असून घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. १० दिवस चालणाऱ्या या सणाच्या प्रत्येक दिवशी गणपत्ती बाप्पाची मनोभावाने पुजा-आर्चना केली जाते. यावर्षी गुणेश चतुर्थीचा हाच जल्लोष-उत्साह उद्यापासून म्हणजेच १० सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बघता सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून पुन्हा एकदा निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या नियमानुसारच बाप्पाचं आगमन होईल. घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होईल, यात शंका नाही. मात्र आपल्या घरी येणाऱ्या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कोणत्या वेळी करावी? बाप्पाला कधी विराजमान करावे? हा प्रश्न जर मनात असेल तर आम्ही तुम्हाला बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त सांगणार आहोत.
गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त
भाद्रपद चतुर्थी प्रारंभ शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी १२ वाजून १८ मिनिटे तर भाद्रपद चतुर्थी समाप्ती शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी ९ वाजून ५७ मिनिटांनी होणार आहे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी श्रीगणेशमूर्तीची स्थापना मध्यान्हकाली म्हणजेच सकाळी ११:२१ पासून दुपारी १:४८ पर्यंत करता येणार आहे. परंतु सर्वानाच हे शक्य होते असे नाही म्हणून त्यादिवशी पहाटे साडेपाच वाजल्यापासून मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत कधीही श्रीगणेशमूर्तीची स्थापना केली तरी योग्य असेल असे पंचागकर्ते दा कृ सोमण यांनी सांगितले आहे.
श्रीगणेशमूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून देवत्त्व आणले जाते आणि श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तरपूजेचे मंत्र म्हणून देवत्त्व काढले जाते. प्राणप्रतिष्ठा करताना गणेशमूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणावेत. त्याचवेळी मूर्तीत देवत्व आल्याची श्रद्धापूर्वक कल्पना करावी. त्यानंतर षोडशोपचार पूजा करावी.